कल्याण/प्रतिनिधी – पुणे येथील कॉलेज मध्ये
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्या कडून
कार्यालयातील देशाचे पंतप्रधान व भाजपा सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा फोटो उतरविल्याने पंतप्रधानाचा केलेल्या अपमानाने कल्याण डोंबिवलीतील भाजपा आक्रमक झाली आहे. केडीएमसी सत्तेतील महायुतीतील शिंदे सेनेने मनसेची युतीतून बाहेर पडावे असा इशारा दिला.तसेच पालीकेतील महायुती मधील आपली भुमिका स्पष्ट करण्या बाबतचे पत्र शिंदे सेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब दिल्याने शिंदे सेना भाजपात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधानाच्या अपमानाचे लोन आता कल्याण डोंबिवली शहरात पोहचले असून भाजपाने मनसे विरोधात एल्गार पुकारला असून भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी
केडीएमसीतील भाजपा गट नेते कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब,भाजपा गट नेते शशिकांत कांबळे,उपमहापौर राहुल दामले,माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे,नगरसेवक मंदार हळबे, विशू पेडणेकर, दया गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, खुशबू चौधरी आदीं उपस्थित होते .यावेळी भाजपाने पत्रकार परिषद द्वारे आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली .
केडीएमसी मध्ये भाजपा, शिंदे सेना- मनसेची महायुती सत्तेवर आहे. महायुतीतील शिंदे सेनेने मनसे पक्षाला बाहेर काढा अन्यथा भाजपा विरोधी पक्षाच्या बाकावर बसून विरोध करेल असा इशाराही भाजपने पत्रकार परिषदेत दिला आहे त्यामुळे मनसेने पंतप्रधानाचा केलेल्या अपमानाचे पडसाद केडीएमसी पर्यंत पोहचले आहे. पालिकेतील शिंदे सेना मनसे जवळीला भाजपने निशाणा साधला असल्याने केडीएमसीतील शिवसेना भाजपची युती फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे सेना भाजपा महायुती फुटण्याची ठिणगी कल्याणात पेट घेणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
एकीकडे शिंदेसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत राहायचे. सत्तेचा लाडू खाऊन दुसरीकडे भाजपच्या विरोधात वागायचे. मनसेला जरा तरी लाज असल्यास त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे अशी टीका भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.
यासंदर्भात शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भाजप जिल्हाध्यक्षांचा फोन मला आला होता. मला पत्र द्यायचे असे त्यांनी सांगितले. भाजपची नेमकी भूमिका काय हे मला अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे याविषयी आत्ता काही सांगणे योग्य होणार नाही असे सांगितले.

