डोंबिवली/प्रतिनिधी – दिपेश म्हात्रे, फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य “स्वराज्य दहीकाला उत्सव 2026” मध्ये यंदा “नारीशक्ती सन्मान” अंतर्गत महिला शक्तीला विशेष मान देण्यात आला आहे. दहीहंडी महोत्सवातील पहिला मान महिला शक्तीला देण्यात आला असून, निर्मल युथ फाऊंडेशनच्या महिला गोविंदांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा ठरणार आहे.
याच कार्यक्रमाच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त भारत या जनजागृती मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या माध्यमातून नशामुक्त भारतचा प्रभावी संदेश देण्यात येत असून, युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे आयोजक भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे, यांनी सांगितले.

