डोंबिवली/प्रतिनिधी -कल्याण–शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माजी आमदार प्रमोद ( राजू )पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कल्याण फाटा येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जनआंदोलन करण्यात आले आहे. येत्या आठवडा भरात या रस्त्यावरील वाहतूक कोंडी प्रश्न निकाली काढला नाही तर मनसे स्टाईलने गाड्या फोडल्या जातील असा इशारा राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
कल्याण – शीळफाटा मार्गावरील जुनाट व अवजड वाहनाच्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिकांचे हैराण झाले असून तासंतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने वाहनचालका सह नागरिक रडकुंडीला आले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण होऊनही नियोजनशून्य कारभार आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष यामुळे हा महत्त्वाचा रस्ता कायमस्वरूपी डोकेदुखी ठरला आहे. नागरिक, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर आणण्यासाठी तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने(मनसे) रविवारी सकाळी कल्याण फाटा येतील रस्त्यावर उतरून प्रशासना विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत जोरदार आंदोलन केले .यावेळी जिल्हा सचिव राहुल कामत, डोंबिवली शहर अध्यक्ष हर्षद पाटील,अरुण जांभळे, योगेश पाटील, नगरसेविका कोमल पाटील यांच्या अनेक पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनाला काँग्रेसने पाठींबा देत डोंबिवली जिल्हाअध्यक्ष अमित म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) पदाधिकारी भालचंद्र ( भाऊ )पाटील यांनीही पाठींबा देत उपस्थिती दर्शविली.या आंदोलनात केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर दररोज वाहतूक कोंडीत अडकणारे सामान्य प्रवासी, स्थानिक नागरिक आणि ‘भूमीपुत्र धर्माभिमानी’ संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील हेदेखील आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कल्याण शिळ फाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही वाहतूक पोलिसांच्या नियोजन शून्य कारभारा मुळे होत आहे.हेवी गाड्यांना या रस्त्यावरून वाहतुकी साठी वेळ ठरवून दिली असताना दिलेल्या वेळच्या आधीच हेवी म्हणजेच अवजड वाहनाची वाहतूक होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीचे काही तास वगळता दिवसभर हा महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगांनी वेढलेला असतो, वाहतूक पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या आधी जर हेवी गाड्या रस्त्यावर वाहतूक करताना दिसल्या तर या गाड्या मनसे स्टाईलने फोडू असा इशाराही राजू पाटील यांनी यावेळी दिला. कोळसेवाडी, डायघर आणि मुंब्रा वाहतूक पोलिसांच्या गस्तीनंतरही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस टोळक्याने उभे राहून फक्त वाहने अडवणे आणि चालकांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला. ज्यामुळे कोंडी अधिकच बिकट होते. अशा कथित वसुलीखोर आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कडक विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या रोजच्या त्रासामुळे नागरिकांचे मोलाचे तास रस्त्यावर वाया जात आहेत. वेळेवर कामावर न पोहोचल्यामुळे चाकरमान्यांच्या पगारात कपात होत आहे, तर स्कूल बसेस अडकल्याने लहान मुले आणि त्यांच्या पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच नाही तर आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नाही.

