उद्योग

यशाची शिखरं सोडून निवडली स्वतःची वाट; नंदिनी कनोई यांचा कॉर्पोरेट ते फिनटेक प्रवास


ठाणे/सतीश तांबे – पारंपरिक रूढी-परंपरांना छेद देत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नसते. मात्र, इच्छाशक्ती, शिक्षण आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत भिवंडीपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास करणाऱ्या नंदिनी कनोई (CPA) यांनी वेगळी वाट निवडत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
मुलींच्या शिक्षणावर मर्यादा घालणाऱ्या सामाजिक वातावरणात नंदिनी यांच्या आईने आपल्या तीनही मुलींना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वातंत्र्य दिले. मुलींच्या हक्कांसाठी त्यांनी ठामपणे भूमिका घेतली. याच संस्कारातून नंदिनी यांच्या प्रवासाला दिशा मिळाली.
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी नंदिनी उच्च शिक्षणासाठी एकट्याच अमेरिकेला गेल्या. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर सुमारे दहा वर्षे जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट फायनान्स क्षेत्रात काम करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही नंदिनी यांनी ऑटोमेटेड वर्कफ्लो विकसित करून गुंतागुंतीच्या आर्थिक प्रक्रिया सुलभ करण्याचे काम केले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कामाची दखल घेत त्यांना अनेक ‘ग्लोबल इनोव्हेशन अवॉर्ड्स’ मिळाले.
मात्र, यशस्वी आणि सुरक्षित कॉर्पोरेट करिअर असूनही काहीतरी नवीन निर्माण करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. फायनान्स क्षेत्रातील त्रुटी दूर करून लहान व्यावसायिक आणि स्टार्टअप्सना अधिक सुलभपणे भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला निरोप देण्याचा निर्णय घेतला.
या प्रवासात वैद्यकीय अडचणी आणि परदेशातील व्हिसासंबंधी मर्यादा अशी अनेक आव्हानेही त्यांच्यासमोर आली. मात्र, नियोजन, शिस्त आणि स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी नव्या वाटेवर वाटचाल सुरू ठेवली.
नंदिनी यांनी जागतिक दर्जाच्या जर्नल्समध्ये संशोधन प्रसिद्ध केले असून पेटेंट-प्रलंबित तांत्रिक फ्रेमवर्कही विकसित केले आहे. सध्या त्या ‘Suvia’ या फिनटेक स्टार्टअपची उभारणी करत आहेत. लहान व्यावसायिक आणि स्टार्टअप्सना सहजपणे भांडवल मिळवून देणे तसेच कर्जप्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने या प्रणालीची निर्मिती करण्यात येत आहे.
“आयुष्याला वळण देणारे निर्णय घेताना आधी स्पष्टता नसते, तर स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो,” असे नंदिनी सांगतात.
एका आईने आपल्या मुलींना दिलेल्या स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या संधीपासून सुरू झालेला हा प्रवास आज कॉर्पोरेट फायनान्सपासून फिनटेक उद्योजकतेपर्यंत पोहोचला आहे. स्वतःची सुरक्षित वाट सोडून नव्या कल्पनेवर विश्वास ठेवत स्वतःचा मार्ग निर्माण करण्याची नंदिनी कनोई यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »