कल्याण

केडीएमसीच्या मालमत्ता कमी भाड्याने दिल्याने मनसे नगरसेवकाचा आक्षेप,आयुक्तांकडे मागणार दाद

कल्याण /प्रतिनिधी – शेठ का माल घासलेट …या युक्ती प्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालकीच्या मोलाच्या ठिकाणी असलेल्या जागा व वास्तू कवडीमोल भावने भाड्याने देण्याचा सपाटा पालिका प्रशासन लावत असून पालिकेच्या कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान करीत आहेत. असाच प्रकार कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील पालिकेची मालमत्ता कवडीमोल भावाने भाडे तत्वावर देण्यासाठी महापालिकेने निविदा मागविली. मात्र ही मालमत्ता १० वर्षांच्या कालावधी करिता अत्यंत कमी भाडे दराने भाड्याने दिल्या प्रकरणी मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी आक्षेप घेत विरोध केला होता मात्र सदरचा विषय सत्ताधारी पक्षांनी मंजूर केल्याने पालिकेच्या मालमत्तांच्या मलिदा खाण्यासाठी सर्वच एकत्र आल्याचे दिसून आले .

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील अनेक शहरांमध्ये पालिकेच्या मालकीच्या जागा, गाळे (दुकाने), किंवा इमारती अनेक वर्षांपूर्वी अत्यंत कमी दराने भाड्याने दिलेल्या असतात आणि आजही त्यांचे भाडे वाढवले जात नाही.त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता कवडी मोल भावाने भाडे तत्वावर देणे हा विषय गंभीर व वादग्रस्त बनला आहे.

कल्याण पश्चिम कडील सहजानंद चौकात मोक्याच्या जागेवर आजच्या बाजारभाव मूल्या पेक्षा ही जास्तीचे भाडे आकारले जाते. असे असताना महापालिकेने सहजानंद चौकातील मोक्याच्या जागेवरील महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारतीत दोन वाणिज्य गाळे भाड्याने देण्यासाठी निविदा मागवविली होती. निविदा मंजूर झाल्यावर हा विषय नुकत्याच पार पडलेल्या महासभेत मंजूरासाठी ठेवला होता. त्याला मनसे नगरसेवक म्हात्रे यांनी आक्षेप घेण्यापूर्वीच त्यांना महापौरांनी बोलू दिले नाही. हा विषय सत्ताधाऱ्या समवेत मंजूर करण्यात आला. या विषयाच्या मंजूरीस म्हात्रे यांचा विरोध होता. तरी देखील हा विषय सत्ताधारी पक्षाने मंजूर करण्यात आला.

नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, मोक्याच्या जागेवरील महापालिकेची मालमत्ता असलेल्या इमिारतीत दोन गाळे वर्षाला ४१ हजार रुपये भाड्याने दिले आहे. जीएसटी कर पकडून वर्षाचे एकूण भाडे ४८ हजार रुपये नमूद करण्यात आले आहे. हे दोन्ही गाळे दहा वर्षाकरीता भाडेतत्त्वावर दिले गेले आहेत. गाळे भाड्याने देताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजारमूल्य किती आहे याची शहानिशा न करता हा विषय महासभेसमोर आणला.पालिकेच्या मोक्याच्या ठिकाणच्या जागा कवडी मोल भावाने भाडे तत्वावर दिल्या जात असल्याने पालिकेचे करोडो रुपयांचे आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडले जात आहे.हा पैसा जनतेच्या विकास कामावर खर्च करता येऊ शकतो . या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »