कल्याण/प्रतिनिधी – शिक्षण क्षेत्रातील काळाबाजार व नीट परीक्षेच्या पेपरफुटीने परीक्षार्थी विद्यार्थिनी केलेल्या आत्महत्या या ज्वलंत विषयावर कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने नीट परिक्षा पेपरफुटीचा देखावा साकारला आहे. दरवर्षी सामाजिक प्रश्नाच्या देखाव्यांतून जनजागृती करणे मंडळाचा उद्देश असल्याने मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची एकच गर्दी होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून मंडळाचे पदाधिकारी सुनील केणे, नितिन बनसोडे, विलास बाईत, आनंद शिंदे ,सतीश सोनावणे यांनी हा देखावा साकारला आहे. या मंडळाचे हे ४० वे वर्ष आहे. या मंडळाचा गणपती नेतिवलीचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे. मंडळाने या पूर्वी मराठी भाषा अभिमान, ऑनलाइन लॉटरीवर या महत्वाच्या विषयावर देखावे साकारलेले आहे. यंदा नीट पेपरफुटीचा विषय आहे. पेपर फूटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आपल्या देशात परीक्षा पद्धती पारदर्शक नाही. त्याचा फटका पालक आणि विद्यार्थी वर्गास सहन करावा लागतो. पाश्चिमात्य देशात परीक्षा प्रक्रिया आणि पद्धती पारदर्शक आहे. चीनमध्ये ती अधिक पारदर्शक आहे.
यावर या देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या मंडळाने मांडलेल्या अनेक देखाव्यांची दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाला अनेक पुरस्कार पारितोषिके मिळाली आहे. मंडळाच्या मंडपात पावित्र्य जपले जाते. स्वच्छता आणि शांतता आणि सुमधूर संगीताने गणेशाचे पूजन केले जाते.दरवर्षी सामाजिक प्रश्नावर समाज प्रबोधनपर आणि ज्वलंत विषयावर साकारलेला देखावा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

