कल्याण/प्रतिनिधी – गणेशोत्सवाचा अवघ्या काही दिवसा वर येऊन ठेवला आहे. घरात गणेशाच्या आगमनासाठी घरात मंगलमय वातावरणाला सुरुवात झाली असतानाच गेल्या आठवडा भरा पासून घरात पाण्याचा एक ही थेंब नसल्याने पाणी टंचाईग्रस्त आशेळे परिसरातील संतप्त नागरिकांनी उद्धव सेनेच्या पुढाकाराने रिकामे बादल्या व हांडे घेऊन पालिका मुख्यालयावर मोर्चा काढीत आपला रोष व्यक्त केला तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.
आशेळे परिसरात पालिके कडून पुरवठा केला जाणारा पाणी पुरवठा अपुरा होत असल्याने या भागातील नागरिकांना गेल्या आठ दिवसा पासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सणासुदीच्या दिवसात श्री गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू असताना घरात पाणी नसल्याने नागरिक रडकुंडीला आले आहेत.अपुऱ्या पाणी पुरवठा बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सदरची बाब निदर्शनास आणून देऊनही पाणी टंचाई समस्या दूर केली जात नसल्याने या परिसरातील नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला आहे.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली या परिसरातील शेकडो नागरिक महिलांनी रिकाम्या बाद ल्या हांडे घेऊन पालिका मुख्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढला व त्यांनी महापालिकेच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दात निषेध केला. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. मात्र शौचाला जाण्यासाठी पाणी मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.या मोर्चात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक सहभागी झाले होते.विरोधात उद्धव सेनेचे गटनेते उमेश बोरगांवकर यांच्यासह नगरसेविका किर्ती ढोणे, वंदना महिले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, नगरसेवक राहुल कोट, संकेश भोईर, राहुल कोट यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला.
याच भागातील रहिवासी सिद्धार्थ पवार यांनी सांगितले की, आठ-आठ दिवस पाणी येत नाही. आम्ही जगायचे कसे ? ही समस्या एक दिवसांची नसून गेल्या तीन वर्षापासून पाणी टंचाईचा सामना नागरीक करीत आहे. परिसरात राहणाऱ्या जया पगारे यांनी सांगितले की, यापूर्वी चार दिवसातून एकदा तरी नळाला पाणी येत होते. आत्ता आठ आठ दिवस उलटून गेल्यावरही नळाला पाणी येत नाही. आम्ही घरातील कामे कशी करायची. जेवण तयार करण्यासाठी पाणी मिळत नाही. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शौचाला जाण्याकरिता पाणी नाही. ही आमची व्यथा महापालिका प्रशासनाला कळत नाही. प्रशासन काय करते ? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
मागच्या आठवड्यात भाजप नगरसेविकेने उचलला होता आवाज
काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेविका पूजा गायकवाड यांनी आशेळे परिसरातील बेकायदा नळ जोडण्या दिल्या जात असल्याच्या प्रश्नावर आवाज उठविला होता. या बेकायदा नळ जोडण्यांना महापालिका अधिकाऱ्यांची साथ आहे. या भागात बेकायदा चाळी उभारल्या जात आहे. नव्या चाळींना नळ जोडण्या बेकायदेशीरपणे दिल्या जात आहे. मात्र जुन्या चाळीतील नागरीकांच्या पाणी टंचाईकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता.

