कृषी मुख्य बातम्या

दुष्काळी भागात शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, केळी थेट इराणच्या बाजारपेठेत

TRUE NEWS MARATHI

बीड/प्रतिनिधी – बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराणच्या बाजारपेठेत सुरू आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून या शेतकऱ्याने निर्याती योग्य केळीचे पीक घेऊन त्याची निर्यात इराणकडे सुरू केलीय.

आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परिणामी या तालुक्यात पाण्याची नेहमी भ्रांत असते. त्यामुळे शेती करणे कठीण असतं. परंतु अशा असंख्य अडचणींवर मात करून आष्टी तालुक्यातील भातोडी इथल्या शंकर गित्ते या शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यातून 7250 रोपे आणून पाच एकर क्षेत्रावर सहा बाय पाच या पद्धतीने केळीची लागवड केली.यासाठी शेत तळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाद्वारे याचे नियोजन केले. कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शंकर गित्ते यांनी ही बाग जोपासली आहे. ठिबक, रोपे, फवारणी, शेणखत रासायनिक, खते, मजुरी असा एकरी एक लाख तीस हजार खर्च वगळता सहा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. सध्या केळी बागेची तोडणी सुरू झाली असून हीच केळी इराणच्या बाजारपेठेत निर्यात केली जात आहेत.

आधुनिक शेती करण्यासाठी शंकर गित्ते यांना कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत माळरान जमिनीवर गित्ते यांनी नंदनवन फुलवले आहे. केळीच्या बागेची काळजी घेऊन आत्तापर्यंत 175 टन एवढा माल पाच एकरात काढला गेलाय. विशेष म्हणजे यासाठी विक्रीला कुठे न जाता थेट इराणमधील व्यापाऱ्यांनी बांधावर या मालाची खरेदी केलीय. आतापर्यंत 13 ट्रकच्या माध्यमातून ही केळी इराणच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »