TRUE NEWS MARATHI ONLINE.
कल्याण – शहराच्या स्वच्छतेवरुन शहराची प्रतिमा जनमानसापर्यंत पोहचते, त्यामुळे स्वच्छतेचे काम सर्वात महत्वाचे असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज केले. महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये सफाई कर्मचा-यांकरीता आयोजिलेल्या क्षमता बांधणी कार्यशाळेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत उपस्थित सफाई कर्मचा-यांना “सफाई-मित्र” असे संबोधत, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सफाई कर्मचा-यांशी संवाद साधत आपल्या छोटेखानी भाषणात स्वच्छतेचे महत्व उपस्थित सफाई कर्मचा-यांना पटवून दिले.
स्वच्छ आणि सुंदर रस्ते यांचे श्रेय केवळ सफाई कर्मचा-यांचे असून, सफाई कर्मचा-यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी शिबीर लावावे, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिले. तसेच सेवा विषयक काही विषय असल्यास ते मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
आपले स्वत:चे स्वास्थ चांगले असेल, तर चांगली कामे होऊ शकतील. यासाठीच या कार्यशाळेचे/ प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी यावेळी दिली आणि प्रशिक्षणातील आपले अनुभव, ज्ञान कृतीत आणा असे सांगत स्वच्छतेचे महत्व उपस्थित सफाई कर्मचा-यांसमोर अधोरेखित केले.
दिव्य स्वप्न फाऊंडेशन या संस्थेमार्फत आतापर्यंत डोंबिवलीच्या प्रभागात कार्यरत असणा-या 800 सफाई कर्मचा-यांना आता पर्यंत क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आता कल्याण मधील सफाई कर्मचा-यांना हे प्रशिक्षण सदर संस्थेमार्फत दिले जात आहे. आजच्या या कार्यशाळेत उत्कृष्ठ सफाई कर्मचा-यांना अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व उपस्थित इतर अधिका-यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पीपीई कीट, मास्क, ग्लोव्हज्, शुज, रिफलेक्टर जॅकेट इ. अंतर्भाव असलेला सुरक्षा संच देवून गौरविण्यात आले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, 3/क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदिप खिस्मतराव, घनकचरा व्यवस्थापन विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी आणि 3/क प्रभागातील सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

