TRUE NEWS ONLINE
कल्याण -केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या भारत अभियानाचा मूलभूत घटक असणारे सफाई कर्मचारी यांचे शहर स्वच्छते मध्ये मोलाचे योगदान आहे. या स्वच्छता अभियानातील सफाई कर्मचारी यांचे योगदान तसेच जबाबदारी लक्षात घेवून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ व अतिरीक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या निर्देशानुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यस्वप्न फांऊडेशन यांच्या सहकार्याने ” स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ” अंतर्गत महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचा-यांकरिता दिनांक ६ जानेवारी २०२५ पासून ”क्षमता बांधणी प्रशिक्षण (घनकचरा व्यवस्थापन व वैयक्तिक स्वास्थ्य सुरक्षा विषयक कार्यशाळा)’ आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत सफाई कर्मचा-यांना घनकचरा विषयक माहिती, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, विशेषत: काम करताना घ्यावयाची काळजी, पीपीई कीट वापर संदर्भात प्रात्याक्षिक, कामासंबंधित होणारे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय व उपचार, वैयक्तिक स्वास्थ्य व सुरक्षा कशी राखावी या विषयक माहिती देण्यात येत आहे. तसेच या सफाई कर्मचाऱ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देखील देण्यात येत आहे. या शिबीरामुळे सफाई कर्मचा-यांची क्षमता बांधणी होण्यास मदत होणार आहे.
महानगर पालिकेच्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन प्रभाग निहाय करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातील सर्व महिला व पुरुष सफाई कर्मचारी यांना या कार्यशाळे मार्फत स्वत:ची ओळख व त्यांच्या कामाचे महत्त्व याची देखील ओळख पटवून दिली जात आहे.
महा पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह, ग, फ, इ व आय या प्रभागातील सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून प्रशिक्षणा दरम्यान संबधित सर्व प्रभागातील उत्कृष्ठ काम करणा-या प्रत्येकी २ सफाई कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आल्यामुळे त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या कर्मचा-यांपैकी प्रत्येक प्रभागातील ५ सफाई कर्मचारी यांना महापालिकेमार्फत स्व सुरक्षा उपकरणे वितरीत करण्यात आली आहेत.
६ जानेवारी ३०२५ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये डोंबिवली पूर्वेतील आनंद दिघे सभागृह येथे डोंबिवली विभागातील सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून, सदर प्रशिक्षणादरम्यान महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, परिमंडळ -2 चे उप मुख्य स्वच्छता निरीक्षक आगस्तीन घुटे, तसेच फ व ग प्रभागक्षेत्राचे स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, ह प्रभागक्षेत्र कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी सुरेश सोळंके यांचेसह प्रभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाचे आयोजनाची जबाबदारी ही दिव्यस्वप्न फाउंडेशन यांना देण्यात आलेली असून संबंधितत संस्थेचे प्रशिक्षक शिवराज जाधव, ऐश्वर्या जोशी व अमर लोखंडे यांचेमार्फत उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या शिबीराचा लाभ आतापर्यंत जवळपास ८०० सफाई कर्मचा-यांनी* घेतला आहे.
१३ जानेवारी २०२५ पासून कल्याण पश्चिम येथील महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कल्याण विभागातील प्रभागक्षेत्र कार्यालयामधील सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण शिबीरास सुरुवात करण्यात आलेली असून ब प्रभागक्षेत्र कार्यालयातील सफाई कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. तर पुढील कालावधी मध्ये इतर प्रभागातील सफाई कर्मचारी यांचे देखील नियोजनानुसार प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येणार आहे

