कल्याण चर्चेची बातमी

केडीएमसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची सिंगल युज प्लास्टिक वापरणा-या दुकानांवर कारवाई

TRUE NEWS MARATHI ONLINE.

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील प्रदुषणात भर घालणा-या सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याच्या अनुषंगाने सिंगल युज प्लास्टिक विरोधी मोहिम तीव्र करण्याबाबतचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले होते.

त्याअनुषंगाने गत आठवड्यात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांची बैठक घेवून, सर्व उपस्थित अधिका-यांना तसेच महापालिकेच्या सर्व प्रभागांच्या सहा.आयुक्तांना सिंगल युज प्लास्टिक विरोधी मोहिम राबविणेबाबत सक्त निर्देश दिले होते.

त्यानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, 3/क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदिप किस्मतराव, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वड्डे व त्यांच्या पथकाने, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी आणि राजेश नांदगांवकर, राजेंद्र राजपुत, जयंत कदम यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये पाहणी करुन सुमारे 500 किलो प्लास्टिक जप्त करण्याची धडक कारवाई केली. कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुल मार्केटमधील रामनाथ गुप्ता यांचे फ्लॉवर शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्यामुळे त्यांचेवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील यांनी दिली.

प्लास्टिकमुळे शहरातील पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे यापुढे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आढळल्यास महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. आणि ही मोहिम अधिकाधिक तीव्र केली जाणार असून, यापुढे नागरिकांनी, व्यापारी संघटनांनी सिंगल युज प्लास्टिक ऐवजी कागद वा कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी केले आहे.

सदर प्लास्टिक बारावे प्लांन्ट येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांसमवेत शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »