नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – “देवशयनी आषाढी एकादशीचे” औचित्य साधत कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या वतीने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या वारकरी दिंडीत इयत्ता पहिली ते चौथी वर्गाच्या सुमारे ५०० विदार्थ्यांनी सहभाग घेतला.सकाळी बालक मंदिर संस्था ते विठ्ठल मंदिर, शिवाजी चौक कल्याण प. येथे ही वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती.
वारकरी दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थांनी विठ्ठल रुख्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम या सारख्या विविध संतांची वेशभूषा साकारली होती. तसेच मुलींनी नऊवारीसाडी व मुलांनी वारकऱ्यांचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. विद्यार्थांनी साकारलेल्या संतांच्या वेशभूषेमुळे वारकरी दिंडीची रंगत अधिक वाढली.
वारक-यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते. लेझीमच्या तालावर ठेका घेत सर्व शिक्षक विद्यार्थी रिंगण करत होते. वारकरी दिंडीत “झाडे लावा, झाडे जगवा “प्लास्टिकचा वापर टाळा -पर्यावरणाचे रक्षण करा” या सारखे पर्यावरण विषयक संदेशही देण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार व सुवर्णा ठाकरे, शालेय समिती अध्यक्ष रमेश गोरे, संस्था कार्यवाह डॉ. सृश्रुत वैद्य, इंग्रजी माध्यम शालेय समिती अध्यक्ष तेजस्विनी पाठक, प्रसाद मराठे, अनिल कुलकर्णी व सर्व शालेय समिती पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व पालक वर्ग, हितचिंतक यांच्याकडून कौतुक होत आहे.

