लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डॉक्टरांनी प्रोटोकॉलचे पालन केल्यास रेमडीसीवीरचा तुटवडा होणार नाही -जगन्नाथ शिंदे

कल्याण प्रतिनिधी – सध्या ठाणे जिल्ह्यासह मुंबईत रेमडीसीविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. मात्र कोवीड टास्क फोर्सने दिलेल्या प्रोटोकॉलनूसार खासगी डॉक्टरांनी सरसकट सर्वांऐवजी अत्यावश्यक रुग्णालय हे इंजेक्शन दिल्यास त्याचा तुटवडा भासणार नाही. तसेच येत्या 3 – 4 दिवसांत रेमडीसीविर इंजेक्शनचा मोठा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
रेमडीसीविर इंजेक्शन घेण्यासाठी कल्याण पूर्वेतील एका मेडीकलमध्ये मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी कल्याण डोंबिवली बरोबरच शेजारच्या शहरांसह मुबंईतुनही अनेक जण रेमडीसीविरसाठी वणवण फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कोवीड टास्क फोर्सने खासगी डॉक्टरांना कोवीड रुग्णांबाबत दिलेल्या ए, बी, सी, डी आणि ई या वर्गवारीनुसार इंजेक्शन लिहून दिले पाहिजेत. सरसकट सर्वांना ते लिहून न देता ज्या रुग्णाला गरज आहे त्यालाच लिहून दिल्यास सध्या निर्माण झालेली टंचाई कमी होण्यास मोठी मदत होईल असे मत जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
रेमडीसीविर इंजेक्शन बनवण्यासाठी पूर्वी दोनच कंपन्या होत्या आता तर त्याची संख्या 6 झाली आहे. मात्र सध्या कोरोना रुग्ण वाढीनुसार खासगी रुग्णालयेही वाढली आणि त्यातही डॉक्टरकडून सरसकट प्रत्येक रुग्णाला रेमडीसीविर इंजेक्शन लिहून देत असल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.
तर यामध्ये जो कोणी व्यक्ती किंवा एखादा केमिस्ट असोसिएशनचा सदस्य रेमडीसीविरचा काळा बाजार करत असेल तर त्याच्यावर एफडीएने कारवाई करून लायसन्स रद्द करण्याची मागणीही जगन्नाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे. तसेच येत्या 3-4 दिवसांत रेमडीसीविरचा मोठा साठा उपलब्ध होणार असून लोकांना मुबलक प्रमाणात ते उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »