शिक्षण

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेसाठी निवड

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने चंद्रयान 3 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या ठाणे जिल्हा तालुका पातळीवर नोंदणी झालेल्या 424 प्रकल्पांमधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 25 शाळांमधील 75 इतक्या मोठया संख्येने प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झाली असून नमुंमपाच्या शिक्षण व्हिजनचे हे यश असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी ठाणे जिल्हयातून तालुका पातळीवर 424 विज्ञान प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यामधील 283 प्रकल्पांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व पारंपारिक ऊर्जा, शेती व अन्न सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लर्नींग लिंक्स फाऊंडेशन आणि एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज् या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘एडब्ल्यूएस थिंक बिग स्पेस’ या उपक्रमांतर्गत हे प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेकडे पाठविण्यात आले होते. यामधून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या 25 शाळांमधील विदयार्थ्यांच्या 75 प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.

जिज्ञासा ट्रस्ट ही बालविज्ञान परिषदेची 23 वर्षे संघटक म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून यावर्षींची परिषद 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्हा स्तरावर संपन्न‍ होत आहे. या परिषदेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील 75 विज्ञान प्रकल्प सादर केले जाणार आहेत

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विदयार्थ्यांनी इतक्या मोठया संख्येने तालुका स्तरावर मिळवलेले यश हे नमुंमपा शाळांतील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणा-या गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीचे यश असून प्रकल्प सादर करणा-या विदयार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे व संस्थेच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जिल्हास्तरावरील विज्ञान परिषदेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »